सांबार

 

प्रमाण – साधारण ५ ते ६ जणांसाठी 

साहित्य-
१) तूर डाळ – ३/४ कप
२) चिंचेचा कोळ – ३/४ कप
३) मद्रासी कांदे ( छोटे कांदे )- ६ ते ७ (नसल्यास एका मोठ्या कांद्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्याव्यात )
४) दोन शेवग्याच्या शेंगा – सोलून लांब लांब तुकडे करून घ्यावेत
५) दोन वांगी – मोठे मोठे तुकडे करून
६) लाल भोपळ्याच्या फोडी
७) एक मोठा टोमाटो -मोठ्या फोडी करून
८) सांबार मसाला – २ टेबल स्पून
९) गूळ – १ टेबलस्पून
फोडणीसाठी -
 तेल ,१० ते १२ कढीपत्ता पाने , १/४ टी स्पून हिंग, १/४ टी स्पून मोहोरी, १/४ टी स्पून मेथी दाने,१/२ टी स्पून उडीद डाळ , लाल सुक्या मिरच्या  (मी इथे बोर मिरच्या(सांबर मिरच्या ) वापरल्या आहेत )
कृती-
१) तुरीची डाळ  शिजवून घोटून घ्यावी .
२) एका भांड्यात तेल तापवत ठेवावे तेल तापले कि त्यात फोडणीचे दिलेले साहित्य एकानंतर एक टाकावे . त्यानंतर कांदे व शेवगाच्या शेंगा टाकून परतून घ्यावे व त्यात थोडे पाणी घालून झाकण ठेवून ५ ते ६ मिनिट शिजू द्यावे .

शेवगाच्या शेंगा शिजण्यास वेळ लागतो म्हणून त्या थोड्या आधी शिजवून घेत आहोत .
३) त्यानंतर उरलेल्या सर्व भाज्या घालून  त्यात चिंचेचा कोळ घालावा , भाज्या शिजू द्याव्यात ,आता यात शिजवलेली डाळ घालावे व मिश्रण एकजीव करून घ्यावे
४) गरजेनुसार पाणी गव मीठ घालून ढवळून घ्यावे . आता यात सांबर मसाला आणि गूळ घालावा . साधारण एक ते दोन उकळी आणावी व आच बंद करावी
गरमागरम सांबार इडली ,मेदुवडा किंवा आप्पे बरोबर सर्व्ह करावे
टीप -
१) सांबारची चव घेऊन बघावी अजून आंबट हव असल्यास थोडा चिंचेचा कोळ घालावा .

स्मोक्ड कोल्हापुरी चिकन

 

कोल्हापुरी मसाल्यासाठी -
साहित्य- 
१) लाल सुक्या मिरच्या मिरच्या (मधम आकाराच्या ) – १५
२) अख्खे धने – १ टेबल स्पून
३) तीळ – १ टेबल स्पून
४) किसलेले सुखे खोबरे – १/२ कप
५) मेथी दाणे – १ टी स्पून
६) खसखस – १ टी स्पून
७)  इतर मसाले - १ मसाला वेलची, २ वेलदोडे , १२ ते १५ काळीमिरी दाणे ,८ ते १० लवंगा  ,२ तमालपत्र  , दालचिनी -१/२  इंच , १ टी स्पून जिरे
८) जायफळ पूड- दोन चिमुट
९) तेल – १ टी स्पून
इतर साहित्य- 
१) धुवून साफ केलेले चिकन – ५०० ग्राम
२) १ मोठा कांदा बारीक चिरून + १ लहान कांदा बारीक चिरून
३) आल-लसुन पेस्ट – १ टेबलस्पून
४) तेल गरजेनुसार
५) मीठ चवीनुसार
६) सजावटीसाठी कोथंबीर
७) कढीपत्ता पाने – ७ ते ८
८) हिंग – १/४ टी स्पून
९) कोळसा – १
कृती-
१) सुखे खोबरे, जायफळ पूड  वगळता मसाल्याचे बाकी सर्व साहित्य एकत्र करून मंद आचेवर हलकेसे तपकिरी रंगावर भाजून घ्यावे ,त्यानंतर त्याच भांड्यात सुखे खोबरे ही गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यावे ( खोबरे भाजताना पटापट परतावे नाहीतर खोबरे करपेल ) . हा मसाला पूर्णपणे गार झाल्यावर ह्याची मिक्सरमधून बारीक पूड करुन  घ्यावी ,आता ह्यात जायफळ पूड मिक्स करावी . कोल्हापुरी मसाला तयार होईल .
२) एका प्रेशर कुकरमध्ये  तेल गरम करून त्यात १ लहान बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबीसर परतून घ्यावा ,त्यात चिमुटभर हळद घालून मग चिकनचे पिसेस घालावे व परतून घ्यावे . चिकन बुडेल इतपत पाणी  घालून  कुकरचे झाकण बंद करावे व दोन शिट्ट्या करून घ्याव्यात . किंवा चिकन मसाल्यातच शिजवले तरी चालेल पण मी ह्या प्रकारे आधी चिकन शिजवून मग बनवते .
३) आता एका कढाईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता व हिंग घालावा त्यानंतर मोठा बारीक चिरलेला कांदा घालून चांगला तपकिरी होईपर्यंत परतावा यानंतर आल-लसुन पेस्ट घालून परतून घ्यावे ,आता ह्यात तयार कोल्हापुरी मसाला घालावा व परतून घ्यावे . आता ह्यात शिजवलेले चिकनचे पिसेस घालून पुन्हा परतून घ्यावे व ह्यात चिकन शिजवलेलेच  पाणी घालावे . चवीनुसार मीठ घालून ढवळून घ्यावे ,साधारण दोन उकळ्या आल्यावर आच बंद करावी .
४) कोळसा गॅसवर चांगला लालसर तापवून घ्यावा . चिकनच्या मधोमध एक वाटी  ठेवावी व त्यात हा तापवलेला  कोळसा ठेवावा व त्यावर एक चमचा तेल किंवा तूप सोडावे व लगेच घट्ट झाकण ठेवून ८ ते १० मिनिट झाकून ठेवावे शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर  घालून गरमगरम चिकन भाकरी किंवा पोळीसोबत सर्व्ह करावे . 
टीप - 
१) सुक्या मिरच्यांचा तिखटपणा कमी असल्यास चिकन करी बनवत असतानाच त्यात लाल तिखट घालावे किंवा तिखटपणा कमी हवा असल्यास कोल्हापुरी मसाला कमी घालावा . 
२) कोळसा नसल्यास काही हरकत नाही पण कोळश्याच्या धुरामुळे चिकनला वेगळी चव येते . 

समोसा दही चाट

 

साहित्य - 
सारणासाठी 
१) ३ उकडलेले बटाटे ( मोठ्या आकाराचे )  - बारीक फोडी करून
२) फ्रोझन किंवा उकडलेले मटारचे दाणे – ३/४ कप
३)  अख्खे धने- २ टी स्पून
४) बडीशेप – १ टी स्पून
५) आल+लसुन+ हिरवी मिरची पेस्ट – १ टेबल स्पून
६)  १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
७) जिरे ,मोहोरी – १ टी स्पून प्रत्येकी
८) लिंबाचा रस – १ टेबल स्पून
९) कढीपत्ता पाने
१०) लाल तिखट – १ टी स्पून
११) हळद – १/४ टी स्पून
१२) तेल गरजेनुसार ,मीठ चवीनुसार
सामोसा आवरणासाठी -
१) मैदा – २ कप
२) बारीक रवा – २ टेबल स्पून
३) ओवा – १/२ टी स्पून
४) मीठ चवीनुसार
५) मोहनासाठी तेल
इतर साहित्य -
१) तळण्यासाठी तेल
४) गोड दही ( १ ते दीड कप दह्यात साखर टाकून चांगले मिक्स करून घ्यावे )
५) बारीक चिरलेला कांदा व कोथंबीर
६) बारीक शेव ( चाट शेव )
हिरवी चटणी व चिंचगुळाच्या चटणीसाठी इथे क्लिक करा .
कृती-
१) अख्खे धने व बडीशेप हलकेसे भाजून घ्यावे व जाडसर कुटून घ्यावेत
२)  एका कढाईत तेल गरम करून त्यात जिरे,मोहोरी व कढीपत्त्याची फोडणी द्यावी त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा नंतर  आल+लसुन+हिरवी मिरची पेस्ट परतून घ्यावे . आता यात धने-बडीशेप पूड,हळद आणि लाल तिखट घालून परतावे . उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणे मटारचे दाणे टाकून मिश्रण नित परतून घ्यावे ,चवीनुसार मीठ व लिंबाचा रस घालून एकजीव करून घ्यावे . शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर घालून भाजी गार करण्यासाठी ठेवावी . 
३) आता एका बोलमध्ये मैदा घ्यावा त्यात मीठ ,रवा व ओवा घालाव्यात , कडकडीत गरम तेलाचे मोहन द्यावे ,तेलाचे मोहन सर्व मैद्याला लागेल याची काळजी घ्यावी ,  याची घट्ट  कणिक भिजून १५ ते २० मिनिट झाकून ठेवावे .
४) तयार कणकेचे गोळे करून घ्यावेत , गोळ्याची मध्यमसर लांबट पोळी लाटून घ्यावी . ह्या पोळीचे दोन समान भाग करून घ्यावेत आता कापलेल्या भागाच्या दोन्ही बाजू मधोमध आणून पाण्याने चिकटवून घ्याव्यात म्हणजे कोनाचा आकार तयार होईल ,आता ह्या कोनात तयार समोश्याचे सारण भरून घ्यावे व सर्व कडेला पाणी लावून एक बाजू दुसऱ्या बाजूवर दुमडून समोस्याचे तोंड  नीट बंद करून घ्यावे . ह्याप्रकारे सर्व समोसे तयार करून घ्यावेत . 
५) तयार सामोसे मंद आचेवर खुसखुशीत  तळून घ्यावेत . सामोसे मंद आचेवरच तळावे नाहीतर थोड्या वेळात ते मऊ पडतात .
६) एका प्लेटमध्ये दोन समोसे कुस्करून घ्यावे त्यावर हिरवी चटणी ,चिंचगूळाची चटणी व गोड दही घालावे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा व कोथंबीर घालावे व सर्वात शेवटी बारीक शेव घालून समोसा दही चाट सर्व्ह करावा . 

ऑरेंज चॉकलेट केक

 

साहित्य- 
१) केक फ्लोअर किंवा मैदा – १ ३/४ कप
२) कोको पावडर – ३/४ कप
३) बटर – ८० ग्राम
४) अंडी -३
५) बारीक  साखर( granulated sugar ) - १ ३/४ कप
६) बेकिंग पावडर- १ टी स्पून
७) बेकिंग सोडा ( खायचा सोडा ) – १ टी स्पून
८) व्हनिला  इसेन्स – १ टी  स्पून 

९) संत्र्याची किसलेली साल ( orange zest ) – १ टी स्पून
१०) ताजा संत्र्याचा रस ( fresh orange juice ) – १ कप
११) चॉकलेट  गनाश frosting  साठी
सर्व साहित्य room temperature ला असावे .बटर किंवा इतर साहित्य  साधारण  अडीच ते तीन तास आधी फ्रीजमधून काढून ठेवावे
कृती-
१) सर्वात प्रथम एका ९ इंचाच्या गोल केक टीनला तुपाचा हात फिरवून घ्यावा व त्यावर मैदा भुरभुरून घ्यावा .
२)  केक फ्लोअर ,बेकिंग पावडर,बेकिंग सोडाव कोको पावडर  एकत्र करून एकदा चाळुन  घ्यावे म्हणजे ते एकजीव होतील . तसेच एका बोलमध्ये अंडी व व्हनिला एसेन्स  फेटून घ्यावा  .
३)  एका मोठ्या बोलमध्ये बटर व साखर फेटून घ्यावे आता ह्यात केक फ्लोअर व कोको पावडरचे मिश्रण ओतून घ्यावे . त्यानंतर हळूहळू अंड्याचे मिश्रण टाकून नीट एकजीव करत राहावे , यात orange zest (संत्र्याची किसलेली साल ) व ताजा संत्र्याचा रस घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे .  तयार मिश्रण केक टीन मध्ये ओतून घ्यावे .
४) ओव्हन १८० डिग्री सेल्सियस ला preheat करून घ्यावा व केक साधारण ३८ ते ४२ मिनिट बेक करून घ्यावा .केकच्या मध्यभागी toothpick घालून पाहावे जर  toothpick clean   बाहेर निघाली तर केक झाला आहे असे समजावे आणि जर तिला थोड केकचे मिश्रण लागले असेल तर अजून २ ते ३ मिनिट त्याच तापमानाला बेक करून घ्यावे
५) केक बेक झाल्यानंतर त्याला एका जाळीवर थंड होण्यास ठेवावा , साधारण १५ मिनिटात केक टीन मधून केक बाहेर काढावा व त्याला पूर्णपणे  गार  होऊ द्यावे . त्यानंतर केकवर  चॉकलेट  गनाशचा जाडसर थर   लावून घ्यावा ,केक पूर्णपणे चॉकलेट  गनाशने कव्हर करून घ्यावा . केक काही तासांसाठी फ्रीझमध्ये सेट करण्यास ठेवावा .
चॉकलेट गनाशच्या रेसेपी साठी इथे क्लिक करा
टीप -
१)  वरील केकसाठी चॉकलेट गनाश बनवताना मी डार्क चॉकलेट वापरले होते तसेच त्यातही मी orange zest  टाकले होते .
२) हा केक बनवल्यानंतर दुसऱ्या  किंवा तिसऱ्या  दिवशी जास्त चांगला लागतो .
३) केक बनवताना सर्व साहित्य कक्ष तापमानाला ( room temp. ) असावे नाहीतर केक हवा तसा बनणार नाही .

चुरमा लाडू

 

साहित्य-
१) बेसन – २ कप
२) साखर – पावणे दोन कप
३) पाणी – साखरेच्या निम्मे
४) केसर – १० ते १२ काड्या (ऐच्छिक )
५) वेलची पूड- १ टी  स्पून
६) मनुके आणि बदामाची भरड
७) तळण्यासाठी  तूप
कृती -
१) एका बोलमध्ये बेसन घ्यावे व गरजेपुरता पाणी घालून घट्ट मळून घ्यावे  व २० मिनिटे झाकून ठेवावे . त्यानंतर हे पीठ परत एकदा मळून घ्यावे . 
२) तयार पिठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात व त्याला काट्याने टोचून घ्यावे म्हणजे पुऱ्या जर खुशखुशीत होतील व गरम तुपात मध्यम आचेवर तळून घ्याव्यात . 
३) पुऱ्या  जरा  थंड झाल्यावर हाताने चुरडून घ्याव्यात व नंतर मिक्सरमधून थोड जाडसर किंवा रवाळ दळून घ्यावे (चुरा  एकदम बारीक करू नये किंचित  जाडसरच ठेवावा ) 
४) एका पातेल्यात साखर घ्यावी व साखरेच्या निम्मे पाणी तसेच केसर घालून दोन तारी  पाक बनवून घ्यावा ( पाकाचे काही थेंब अंगठा आणि तर्जनीमध्ये घ्यावे आणि त्यांची उघडझाप करावी  दोन तारी दिसल्यात तर पाक झाला आहे असे समजावे किंवा  ,एका बशीत पाणी घेऊन त्यात पाकचे ३ ते ४ थेंब टाकून पाहावे जर मऊसर गोळी बांधली जात असेल तर पाक झाला आहे असे समजावे )
५) आता ह्या गरमागरम पाकात तयार चुरा घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे ,त्यात वेलची पूड, बदामाची भरड आणि मनुके घालावेत व पुन्हा एकदा एकजीव करून घ्यावे . मिश्रण आळल्यावर  त्याचे लाडू वळून घ्यावेत . 
वरील प्रमाणात साधारण १७ ते १८ लाडू होतील .
गोडपणा कमी हवा असल्यास साखर दीड कप व साखरेच्या निम्मे पाणी घ्यावे व पाक बनवावा .

बालुशाही

 

साहित्य -
१) मैदा – १ कप
२) तूप – २ टी स्पून
३)  ताजे थंड दही – २ टेबल स्पून
४) बेकिंग पावडर- १/४ टी स्पून
५) बेकिंग  सोडा – १/४ टी स्पून
६) साखर – १ कप
७) पाणी – १/२ कप
८) केसर – ७ ते ८ काड्या , वेलची पूड
९) बदाम-पिस्त्याचे काप
१०) तळण्यासाठी तूप
कृती -
१) मैदा,बेकिंग पावडर,बेकिंग सोडा एकत्र गाळून घ्यावा , यात तूप घालून चांगले मिक्स करून घ्यावे त्यानंतर दही घालून पीठ भिजवून घ्यावे पण अजिबात मळू  नये फक्त मैद्याचा गोळा  बनला पाहिजे . तयार पिठाचा गोळा  १५ ते २० मिनिट झाकून ठेवावा .
२) एका पातेल्यात साखर व साखरेच्या निम्मे पाणी घ्यावे त्यात केसर व वेलची पूड टाकावी आणि एकतारी पाक बनवून घ्यावा .
३) मैद्याच्या पीठाचे लहान लहान पेढ्याऐवढे  गोळे  बनवून घ्यावे (  गोळे बनवतानाही पीठ जास्त मळु नये आणि हे गोळे दिसायला जर खडबडीत दिसतील पण ते तसेच हवे आहेत तरच ते हलके होतील ) त्याच्या मध्यभागी अंगठ्याने जर दाबून घ्यावे . आता हे गोळे मंद आचेवर तुपात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून  घ्यावे .
४) तळलेले गोळे ४ ते ५ मिनिटांनी पाकात टाकावे ( पाक थोडा   गरम असावा ) आणि साधारण ७ ते मिनिट पाकात ठेवल्यावर बालुशाही बाहेर काढावी आणि बदाम व पिस्त्याच्या कापानी सजवावी . वरील प्रमाणात साधारण ११ ते १२ बालुशाही बनतील . 

सुकी शेवभाजी

 

साहित्य-
१) तिखट जाड शेव – १ कप
२) बारीक चिरलेला कांदा -३/४ कप
३) बारीक चिरलेला टोमाटो – ३/४ कप
४) आल-लसुन पेस्ट – १ टेबल स्पून
५) जीर -मोहोरी- १/२ टी स्पून प्रत्येकी
६) कढीपत्ता
७) लाल तिखट  - २ टी  स्पून
८) धणेपूड- १ टी स्पून
९) गरम मसाला – १/४ टी स्पून
१०) गरजेनुसार तेल
११) चवीनुसार मीठ
१२) कोथंबीर 
कृती - 
१) एका काढाईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात  जिरे-मोहोरी टाकून तडतडू द्यावी त्यानंतर कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतावा त्यानंतर आल-लसुन पेस्ट घालून परतावे व बारीक चिरलेला टोमाटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवावा .
२) आता यात लाल तिखट,धणेपूड आणि गरम मसाला घालून एकजीव करून घ्यावे ,यात शेव टाकून नीट परतून घ्यावे आणि यात अगदी थोडेसच पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून साधारण ५ ते ७ मिनिट मध्यम आचेवर शिजवावे ,सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथांबीर घालावी आणि सर्व्ह  करताना  वरून एक लिंबाची फोड पिळावी आणि गरमागरम पोळी किंवा फुलाक्यासोबत सर्व्ह करावे .
टीप -
 १) ह्या भाजीत जास्त पाणी घालू नये आणि  भाजी जास्त शिजवू नये नाहीतर शेव गळून पडेल .
२) शेवभाजीसाठी  शक्यतो जाड शेव वापरावी .

कढाई पनीर

 

साहित्य-
 कढाई मसाल्यासाठी -
७ ते ८ काळीमिरी ,३ लवंगा ,२ वेलदोडे ,१ टेबल स्पून धने, १ टी स्पून जिरे, १ टी स्पून बडीशेप, ४ लाल सुक्या मिरच्या ,१ तमालपत्र
ग्रेव्हीसाठी -
१ लहान कांदा बारीक चिरून
३ मध्यम आकाराचे टोमाटो  बारीक चिरून
आल-लसुन पेस्ट -प्रत्येकी १/२ टी स्पून
इतर साहित्य -
पनीर- २५० ग्राम
कांद्याचे मोठे तुकडे – मुठभरून
सिमला मिरचीचे तुकडे- १/४ कप
१/२ टी स्पून लाल तिखट
१/२ ती स्पून कसुरी मेथी
१/२ टी स्पून साखर
क्रीम (ऐच्छिक )
चवीनुसार मीठ
गरजेनुसार तेल
सजावटीसाठी कोथंबीर
कृती-
१) सर्वात प्रथम मसाल्याचे सर्व साहित्य एकत्र  कोरडेच भाजून घ्यावे ( मसाला भाजताना करपू देऊ नये ) व मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यावे .
२) एका कढाईत तेल गरम करावे त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतावा त्यानंतर आल-लसुन पेस्ट घालून परतावे ,बारीक चिरलेला टोमाटो घालून तो पूर्णपणे गळेपर्यंत परतावा . आता हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे त्यानंतर मिक्सरमधून बारीक प्युरी करून घ्यावी .
३) दुसर्या एका कढाईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात कांद्याचे तुकडे घालून परतावे नंतर सिमला मिरचीचे तुकडे घालून परतावे ,कढाई मसाला घालावा व परतावे यात लाल तिखट घालावे व परतून घ्यावे. आता तयार ग्रेव्ही घालावी , चवीनुसार मीठ घालावे व नंतर क्रीम व साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे .
४) पनीरचे तुकडे घालावेत व एक ते दोन उकळी येऊ द्यावी त्यानंतर कसुरी मेथी घालावी व आच बंद करावी ,सर्व्ह करताना वरून बारीक चिरलेली कोथंबीर  घालावी .

हिरवी चटणी -चिंच-गुळाची चटणी

हिरवी चटणी

साहित्य-
१) पुदिना पाने – १/२ कप
२) कोथंबीर -१ कप
३) हिरवी मिरची – १ ( मध्यम  आकाराची )
४) लसुण -२ लहान पाकळ्या
५) चवीनुसार मीठ
६) लिंबाचा रस – १ टेबलस्पून
कृती -
१) वरील सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात थोडे पाणी टाकावे आणि बारीक वाटून घ्यावे .
चिंच-गुळाची चटणी 
साहित्य -
१) चिंच – १/२ कप
२) गूळ – १/२  ते ३/४ कप
३) लाल तिखट – २ चिमुट
४) चिमुटभर मीठ
कृती -
१) चिंच अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवावी ,त्यानंतर हाताने चांगली कुस्करून घ्यावे व गाळणीने गाळून घ्यावे यात आता गूळ ,लाल तिखट व मीठ कालवून मध्यम आचेवर एक उकळी येईपर्यंत शिजवावे .

फोडणीची मूग डाळ

 

साहित्य-
१) मूग डाळ – १/२ कप
२) बारीक चिरलेला टोमाटो -१/४ कप
३) बारीक चिरलेला लसूण  - दीड टी स्पून
४) लाल तिखट – १ टी  स्पून
५) हळद – १/८ टी स्पून
६) कसुरी मेथी ( हलकीशी भाजून चुरडून )- १/२ टी स्पून
७) कढीपत्ता – ७ ते ८ पानं
८) हिंग – दोन चिमुट
९) चवीनुसार मीठ
१०) गरजेनुसार तेल
११) बारीक चिरलेली कोथंबीर
कृती-
१) मुगाची डाळ स्वच्छ धुवून मऊसर  शिजवून घ्यावी ,पूर्णपणे गळू देऊ नये . डाळ  शिजत आली कि त्यात बारीक चिरलेला टोमाटो  व चवीनुसार मीठ घालून निट  एकजीव करून घ्यावे व डाळ एका बाजूला ठेवावी .
२) एका लहान कढल्यात  तेल चांगले गरम होऊ द्यावे त्यानंतर एकानंतर एक पटापट मोहोरी,जिरे,हिंग ,कढीपत्ता घालावा त्यानंतर बारीक चिरलेला लसूण ,हळद आणि लाल तिखट घालावे ,चमच्याने थोड हलवून लगेच हि फोडणी शिजलेल्या डाळीवर घालावी व घट्ट  झाकण ठेवून साधारण ५ मिनिट मध्यम आचेवर शिजू द्यावे . त्यानंतर झाकण उघडावे व यात भाजून चुरडलेली कसुरी मेथी घालावी .
३) सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथांबीर घालून आच बंद करावी व हि फोडणीची मूग डाळ जीरा राईस  किंवा पुलाव सोबत सर्व्ह करावी .